उरण : न्यूज कट्टा
प्रेम प्रकरणातून एका युवतीची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उरणमध्ये घडली आहे. या युवतीचे हात-पाय, स्तन कापून गुप्तांगावरही वार केल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या या युवतीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्यानंतर उरण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींचा तात्काळ शोध घेऊन कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी की, उरण येथील एक २२ वर्षीय युवती गुरुवारपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर गेल्या तीन दिवसांपासून तिचा शोध सुरू होता. मात्र ती कुठेच सापडली नाही. आज पहाटे उरणमधील कोटनाका परिसरात या युवतीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला आहे. या युवतीच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले असून तिचे हात-पाय, स्तनही कापण्यात आले आहेत. तिच्या गुप्तांगावरही वार केले असून हा मृतदेह पाहून पोलीसही चक्रावले.
उरण शहरातील एन आय स्कूलनजीक ही युवती वास्तव्यास होती. कोटनाका पेट्रोलपंपाजवळ या युवतीची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीच्या शोधाला सुरुवात केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते हे करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत आरोपीचा छडा लावून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.





