दौंड : न्यूज कट्टा
दरोड्यातील आरोपीला पोलिस कर्मचाऱ्यानेच लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्ह्यात अडकलेले वाहन सोडवण्यासाठी न्यायालयात अहवाल देण्यासाठी ५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
रमेेश शिवाजी कर्चे या पोलिस कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे डिसेंबर २०२४ मध्ये दरोड्याची घटना घडली होती. त्यामध्ये तक्रारदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींनी वापरलेली महिंद्रा बोलेरो जीप पोलिसांनी जप्त केली होती. ही जीप परत मिळवण्यासाठी तक्रारदाराने न्यायालयात अर्ज केला होता.
या अर्जावर अनुकुल अहवाल देण्यासाठी पोलिस कर्मचारी रमेश कर्चे याने स्वत:साठी आणि तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्यासाठी १० हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या तक्रारीची शहानिशा करण्यात आल्यानंतर संबंधित पोलिस शिपायाने तडजोडीअंती ५ हजार रुपये मागितल्याचे सिद्ध झाले.
त्यावरुन रमेश कर्चे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ व ७ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर दौंडसह पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. तसेच दौंड पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आला असून पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे.





