CRIME BREAKING : दारू पिऊन वाहन चालवताना सापडला; माथेफिरू मद्यपीने महिला पोलिस अधिकाऱ्यावर पेट्रोल टाकत केला जाळण्याचा प्रयत्न, पुणे पोलिस दलात उडाली खळबळ

पुणे : न्यूज कट्टा 

पुणे शहरातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्याच्या समोर शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी संबंधित आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पुणे शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

संजय फकिरा साळवे (रा. पिंपरी चिंचवड, पुणे) असं या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर खूनाचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर आणि पोलिस हवालदार समीर सावंत हे जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी फरासखाना पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागासमोर सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर आणि त्यांचे पथक मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करत होते. या कारवाईदरम्यान, संजय साळवे याचीही तपासणी करण्यात आली. साळवे हा दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाईला सुरुवात केल्यानंतर त्याने पोलिसांच्या हातातील मशीन हिसकावून घेतले.

हा प्रकार पाहून सपोनि शैलजा जानकर या त्या ठिकाणी आल्या. त्यांनी विचारपूस करेपर्यंत संजय साळवे याने पेट्रोलसदृश्य ज्वलनशील द्रव्य शैलजा जानकर व समीर सावंत यांच्या अंगावर फेकले. त्यानंतर त्याने आपल्याकडील लायटरद्वारे या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी धाव घेत प्रसंगावधान दाखवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी संजय साळवे याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ या करीत आहेत. या घटनेनंतर पुणे शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!