शिरुर : न्यूज कट्टा
शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या घोडनदी पात्रात आढळलेल्या मृतदेहाची ओळख आज अखेर पटली. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या माऊली सतीश गव्हाणे या युवकाचाच हा मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं आहे.. त्यामुळं दाणेवाडीत एकच खळबळ उडाली असून माऊलीचा इतक्या निर्घृण पद्धतीने खून कशामुळे झाला याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी दाणेवाडी हद्दीतील घोडनदी पात्रात एक हातपाय आणि मुंडकं नसलेला मृतदेह आढळून आला होता. त्याचवेळी शिरुरच्या सीटी बोरा महाविद्यालयात शिकणारा माऊली गव्हाणे हा युवकही गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता. त्यामुळं हा मृतदेह माऊलीचाच असावा असा अंदाज वर्तवला जात होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासही सुरु केला होता.
आज या नदीपात्रातील एका विहिरीत पोत्यात बांधलेले गाठोडे आढळून आले. यामध्ये हातपाय आणि एक शीर मिळून आले आहे. हे शीर माऊलीचेच असल्याचं त्याच्या कानातील बाळीवरुन निष्पन्न झालं आहे. त्यामुळं गव्हाणे कुटुंबीयांनी एकच आक्रोश करत या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
माऊली या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची इतक्या निर्घृण पद्धतीने खून कोणी आणि कशामुळे केला याचा पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे. या घटेनंतर शिरुर आणि श्रीगोंदा परिसरात खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलिस आणि अहमदनगर जिल्हा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.





