शिरूर : न्यूज कट्टा
शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवरील दानेवाडी गावातून वाहणाऱ्या घोडनदीत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या युवकाच्या मृतदेहाचे हातपाय तोडून मुंडकंही छाटण्यात आलं असून छिन्नविच्छिन्न अवस्थेत हा मृतदेह आढळला. अतिशय निर्घृणपणे या युवकाची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, माऊली सतीश गव्हाणे (वय १९) हा शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवरील दानेवाडी गावाचा रहिवासी असून तो शिरूर शहरातील सीटी बोरा महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होता. दि. ९ मार्च रोजी तो अचानक गायब झाला. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो न सापडल्यामुळे शिरूर येथील घोडनदी पोलिस ठाण्यात दि. ९ मार्च रोजी माऊली गव्हाणे हा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती.
या दरम्यान, बुधवारी दि. १२ मार्च रोजी दानेगाव येथील घोडनदी पात्रातील एका विहिरीत एका अनोळखी पुरुषाचा पोत्यात भरलेला मृतदेह आढळला. या मृतदेहाचे दोन्ही हात, पाय आणि मुंडके छाटल्याचं आढळून आलं आहे. हा मृतदेह माऊली गव्हाणे याचाच असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तसेच या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर पोलिसांच्या पथकाचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर माऊली गव्हाणे याच्या नातेवाईकांनी शिरूर पोलिस ठाण्यात गर्दी करत त्याचा शोध घेण्याची मागणी केली आहे. संबंधित मृतदेह माऊलीच्या वर्णनाशी मिळतेजुळते असल्यामुळे शंकाकुशंका व्यक्त केल्या जात असून गावात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी घटनास्थळी भेट देत पुढील तपासाच्या सूचना दिल्या.





