पुणे : न्यूज कट्टा
सोशल मीडियातून ओळख झालेल्या मुलीला वारंवार मेसेज पाठवत तिच्याशी मैत्री करून नंतर व्हिडिओ कॉल करून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी मुंबईत बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, त्याने अनेक मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केल्याचं तपासात समोर आलं आहे.
दशरथ सिद्धराम गायकवाड उर्फ वनराज आश्विन देशमुख (वय ३२, रा. संतोषनगर, शनि मंदिरासमोर, पुणे) असं या प्रकरणात अटक केलेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दशरथ गायकवाड हा एका मुलीला सोशल मीडियावरील वेगवेगळ्या अकाऊंटवरून चॅटिंग करत होता. या दरम्यान, त्याने वारंवार या मुलीला व्हिडिओ कॉल करून तिचे अश्लील फोटो काढले होते. तसेच या फोटोंच्या आधारे या मुलीला ब्लॅकमेल करत होता.
एवढ्यावरच न थांबता या युवकाने हे फोटो व्हायरलही केले. तसेच या मुलीच्या वडिलांना आणि भावाला शिवीगाळही केली होती. त्यावरून संबंधित मुलीने रत्नागिरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड हा फरार झाला होता. तो सातत्याने पोलिसांना चकवा देत होता. या दरम्यान, तो मुंबईतील चेंबूर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी या आरोपीचा मोबाईल जप्त केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्याने अनेक मुलींशी चॅटिंग करत त्यांचे अश्लील फोटो काढल्याचे आणि ते व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वैभव मोरे, भैरवनाथ सवाईराम, मंदार मोहिते, उमेश गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे.





