CRIME NEWS : ‘ती’ नकोशी झाली म्हणून.. तिसऱ्यांदाही मुलगी झाल्यानं पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतत जीवंत पेटवलं..!

परभणी : न्यूज कट्टा   

घरात मुलगी जन्माला येणं ही भाग्याची गोष्ट समजली जाते. मात्र परभणी जिल्ह्यात लागोपाठ तिसरी मुलगी झाल्याच्या रागातून पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवंत पेटवून दिल्याची अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेने जीवाच्या आकांताने धावाधाव केली. मात्र तिचा जीव वाचला नाही. या प्रकरणी या नराधम पतीवर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी शहरात ही घटना घडली असून मैना काळे असं मृत महिलेचं नाव आहे. तिचा पती कुंडलीक काळे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरात कुंडलीक काळे आणि त्याच्या पत्नी मैना या आपल्या दोन मुलींसह राहत होते. काळे दांपत्याला दोन मुली होत्या. त्यानंतर तिसऱ्यांदाही त्यांच्या पत्नीने मुलीलाच जन्म दिला. त्यामुळं कुंडलीक काळे हे नाराज झाले होते. त्यातून त्या दोघा पती-पत्नीमध्ये सातत्यानं वाद सुरू होते.

याच विषयावरून वाद झाल्यानंतर रागावलेल्या कुंडलीक काळे याने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जीवंत पेटवलं. या घटनेनंतर संबंधित विवाहितेने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. ही घटना पाहणाऱ्या नागरिकांनी तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्नही केला. मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परभणी शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात मयत मैना काळे हिच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कुंडलीक काळे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!