बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरात बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध मंडळांनी जोरदार तयारी केली आहे. या दहीहंडी उत्सवात डिजे सिस्टिमचा वापर टाळण्याबरोबरच सामाजिक सलोखा आणि कायदा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी केले आहे.
राज्यभरात उद्या दि. २७ ऑगस्ट रोजी दहीहंडीचा उत्सव साजरा होणार आहे. बारामतीतील गोविंदा पथक इतरत्र जातात. त्यामुळे बारामतीत दहीहंडी उत्सव दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. त्यानुसार बारामतीत दि. २८ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त शहरातील विविध मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. हा उत्सव साजरा होत असताना कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा अबाधित राहील याची दहीहंडी मंडळांनी दक्षता घ्यावी असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी केले आहे.
दहीहंडी उत्सव साजरा करताना डिजेचा वापर टाळावा. तसेच साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादेतच ठेवावा. या उत्सवात महिला नृत्यांगणांना निमंत्रित केले जाऊ नये आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची सर्व मंडळांनी दक्षता घ्यावी असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.





