दौंड : न्यूज कट्टा
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पंढरपूर येथे वारीसाठी निघालेल्या कुटुंबाला अडवत त्यांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लूटमार केल्याची आणि याच कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, एक कुटुंब आपल्या चारचाकी वाहनाने पंढरपूरकडे निघाले होते. प्रवासादरम्यान, हे सर्वजण स्वामी चिंचोली येथे चहासाठी थांबले होते. चहा घेऊन पुन्हा चारचाकी वाहनात बसत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. धारदार शस्त्राचा धाक दाखवत आणि जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी महिलांच्या अंगावरील दीड लाख रुपये किमतीचे दागिने चोरले.
याचवेळी एका चोरट्याने वाहनात बसलेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने काही अंतरावर झुडपात ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.





