दौंड : न्यूज कट्टा
दौंड तालुक्यातील गलांडवाडी परिसरातील मुळीकवस्ती येथे एका बिबट्याने कळपावर हल्ला करत ११ बकऱ्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता वनखात्याने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथील सचिन मुळीक यांच्या शेतामध्ये भिवाजी लकडे यांच्या बकऱ्यांचा कळप बसवण्यात आला होता. शनिवारी लकडे यांनी आपल्याकडील लहान बकरी राहुटीवर असलेल्या जाळीत कोंडून ठेवली होती. त्यानंतर ते मोठ्या बकऱ्या चरण्यासाठी घेऊन गेले होते. राहुटीवर कोणीही नसल्याची संधी साधत बिबट्याने जाळीत ठेवलेल्या ११ कोकरांवर हल्ला चढवत त्यांचा फडशा पाडला.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी याच भागात एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असल्याचं या घटनेनंतर स्पष्ट झालं आहे. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून या भागात पिंजरा लावण्यासाह बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.





