बारामती : न्यूज कट्टा
काही दिवसांपूर्वी माळेगाव पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली होती. त्यांना पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवडसह फलटण तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. अशातच हे दोन गुन्हेगार मेडद गावात आढळून आल्यानंतर माळेगाव पोलिसांनी नव्याने गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, मेडद येथील महेश ऊर्फ एक्का दत्तात्रय काशीद आणि सुरज ऊर्फ माऊली सोमनाथ काशीद हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात माळेगाव पोलिसांनी या दोघांनाही एक वर्षासाठी पुणे जिल्हा, शहर, पिंपरी चिंचवड आणि फलटण तालुक्यातून हद्दपार केले होते. मात्र हे दोघेही हद्दपारीचा आदेश झुगारून मेडद गावात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक देवीदास साळवे यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या पथकाने माहिती घेत मेडद गावात जाऊन पाहणी केली असता येथील भैरवनाथ मंदिराच्या परिसरात हे दोघेही संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी लागलीच त्यांना अटक करत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम १४२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अमोल राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिस हवालदार सादीक सय्यद यांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार प्रवीण वायसे हे करत आहेत. दरम्यान, हे दोघेही पुन्हा कोणतातरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावात आले होते अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांकडून या दोघांची कसून चौकशी केली जात आहे.





