ELECTION BREAKING : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ‘या’ तारखेला आचारसंहिता लागणार; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद निवडणुका..?

मुंबई : न्यूज कट्टा

राज्यात सर्वत्रच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. मात्र अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. परंतु आता याच आठवड्यात मंगळवार किंवा बुधवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात राज्यातील २८९ नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका घेतल्या जाणार असल्याची माहितीही पुढे आली आहे.

राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या आणि २९ महानगरपालिकांची निवडणूक गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसांत या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि त्यानंतर राज्यभरात आचारसंहिता लागू होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार दि. ५ नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाकडून नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची संपूर्ण तयार झाली असून महानगरपालिकेच्या प्रभाग व महापौरांचे आरक्षणही लवकरच जाहीर केले जाणार आहे. एकूण तीन टप्प्यात ही निवडणूक घेण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपरिषद निवडणुका घेतल्या जातील. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकीत राज्यातील जवळपास नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

राज्यातील २८९ नगरपालिकांसाठी २१ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम, ३२ जिल्हा परिषदा व ३३१ पंचायत समित्यांसाठी ३० ते ३५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम आणि २९ महानगरपालिकांसाठी २५ ते ३० दिवसांचा निवडणूक कार्यक्रम ठरवलं जाईल. त्यानुसार या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत निवडणूक रणधूमाळीला सुरुवात होणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!