पुणे : न्यूज कट्टा
पुणे जिल्ह्यातील एकूण १४ नगरपरिषद व तीन नगरपंचायतींच्या प्रस्तावित सार्वत्रिक निवडणुकीकरिता ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात होती. या प्रारुप यादीच्या अनुषंगाने १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सूचना व हरकती स्वीकारण्यात येणार होत्या. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाकडून सूचना व हरकती स्वीकारण्याची मुदत १७ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.
राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतीची निवडणुकही होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करत सूचना व हरकतींसाठी १३ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र आता यामध्ये वाढ करत ही मुदत १७ ऑक्टोबरपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सूचना व व हरकती सादर करण्याचे आवाहन नगरपालिका शाखेचे प्रशासकीय अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी केले आहे.
नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचना व हरकती यांचा विचार करून दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी नागरिकांच्या सूचना व हरकती संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. अशी माहिती श्री. दुर्वास यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.





