मिरज : न्यूज कट्टा
मनासारखं लग्न न झाल्याच्या कारणातून एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. महिन्यापूर्वी झालेलं लग्न पसंतीचं नसल्याच्या कारणातून झालेल्या कौटुंबिक वादातून बाप-लेकाने एकापाठोपाठ विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली. मिरज तालुक्यातील सोनी येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, महिन्यापूर्वी ज्या घरात आनंदाचं वातावरण होतं, त्याच घरात दोघांच्या मृत्यूमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गणेश हिंदुराव कांबळे (वय ५२) आणि त्यांचा मुलगा इंद्रजीत गणेश कांबळे (वय २२) असं आत्महत्या केलेल्या बापलेकाचं नाव आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश कांबळे यांचा मुलगा इंद्रजीत याचा मागील महिन्यात विवाह झाला होता. मात्र हे लग्न त्याच्या पसंतीने झालेले नसल्यामुळे तो नाराज होता. त्यातूनच या पिता-पुत्रामध्ये सातत्याने खटके उडत होते. विशेष म्हणजे येथील ग्रामस्थ आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यात यश आले नव्हते.
आज शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे या दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे तणावात असलेल्या वडील गणेश कांबळे यांनी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करत आपलं जीवन संपवलं. ही बातमी कळताच गावात एकच खळबळ उडाली. इंद्रजीतलाही ही बातमी समजल्यानंतर धक्काच बसला. त्यामुळं वडिलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेत असताना इंद्रजीतनेही त्याच ठिकाणी विषारी औषध प्राशन केलं.
ग्रामस्थांनी तातडीने दोघांनाही रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच दोघा बाप-लेकाचा मृत्यू झाला होता. मिरज येथील शासकीय रुग्णालयात दोघांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोनी गावावर शोककळा पसरली आहे.





