IAS POOJA KHEDKAR : पूजा खेडकरचं ‘बारामती कनेक्शन’; आईचा शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल..!

पुणे : न्यूज कट्टा        

प्रशिक्षणार्थी म्हणून वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्रताप आता समोर येऊ लागले आहेत. पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांचं ‘बारामती कनेक्शन’ उघड झालं आहे. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केल्याचं समोर आलं आहे. त्याचवेळी पूजाची आई मनोरमा खेडकर यांचा बंदुकीचा धाक दाखवत शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून पुण्यात नियुक्ती झाल्यानंतर पूजा खेडकर या आपल्या थाटामुळे चर्चेत आल्या आहेत. स्वतंत्र वाहनासह निवास व्यवस्था आणि कार्यालयात स्वतंत्र कक्षासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या पूजाचे अनेक उद्योग आता समोर येत आहेत. अशातच आता पूजा खेडकरच्या वडिलांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे तब्बल चौदा गुंठे जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आले आहे. वाघळवाडी येथील गट नं. ८ मध्ये सुमारे १४ वर्षांपूर्वी ही जमीन खरेदी केली असून आज याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचेही बोलले जात आहे.

दुसरीकडे, पुजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी शासन सेवेत असताना कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावल्याची बाब आता समोर आली आहे. खेडकर यांनी अनेक ठिकाणी जमीनी बळकावल्या असल्याचं बोललं जात आहे. मुळशी तालुक्यात खेडकर यांनी २५ एकर जमीन खरेदी केली. त्यानंतर त्यान शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीवरही अतिक्रमण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मनोरमा खेडकर यांनी बंदुकीचा धाक दाखवत दमदाटी केल्याचा व्हिडिओही आता व्हायरल होत आहे.

या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी पुण्यातील पौड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र त्याची दखलही घेतली गेली नाही. वारिष्ठांकडून दबाव आल्यामुळे या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. अशात आता पूजा खेडकरच्या शाही थाटामुळे अनेक दबलेली प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे पूजासह खेडकर कुटुंबावर काय कारवाई होणार याकडेच आता लक्ष लागले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!