पुणे : न्यूज कट्टा
प्रशिक्षणार्थी म्हणून वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकरांचे एकेक उद्योग समोर येत आहेत. अशातच पूजा खेडकरच्या आईचा मस्तवालपणा समोर आला आहे. खासगी वाहनावर अंबर दिवा लावल्याप्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मनोरमा खेडकर यांनी चक्क दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. सगळ्यांना आता टाकेल असा दम भरत पूजाच्या आईने पोलिसांना गेटबाहेरच उभं केलं. एवढ्यावरच न थांबता गेटला आतमधून कुलूप लावत पोलिस कारवाईला मज्जाव केला.
प्रशिक्षणार्थी अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांना पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली होती. मात्र पूजा खेडकर यांनी नियुक्तीपूर्वीच आपल्या अनेक मागण्या करत आपला थाट दाखवून दिला होता. याचवेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कक्ष स्वत:साठी बळकावल्याचा प्रकार समोर आला होता. स्वत:च्या ऑडी या खासगी वाहनावर अंबर दिवा लावून त्यावर महाराष्ट्र शासन असेही नमूद केले होते.
थोडक्यात प्रशिक्षणार्थी असताना पूजा खेडकरने प्रचंड चमकोगिरी करत आपल्या अधिकारांपेक्षा अधिक थाट चालवला होता. त्यातूनच पूजा खेडकरच्या वर्तनाबद्दल थेट जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार केली. त्यानंतर पूजा खेडकरची वाशिम येथे बदली झाली आहे. या दरम्यान, पूजा खेडकरचे अनेक उद्योग समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आयएएस अधिकारीपद मिळवल्याची चर्चा आहे. अशातच केंद्र शासनाने त्यांच्याबद्दलचा अहवाल मागवला आहे.
आईचा मस्तवालपणा आला समोर
पूजा खेडकर आपल्या ऑडी या खासगी वाहनातून जिल्हाधिकारी कार्यालयात ये-जा करत होत्या. त्यावर त्यांनी अंबर दिवा लावत महाराष्ट्र शासन असं नमूद केलं होतं. त्याच वाहनावर कारवाई करण्यासाठी आज पुणे शहर पोलिसांचे एक पथक खेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी गेले होते. त्यावेळी घरात असलेल्या पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांनी चक्क पोलिसांना दमदाटी केली.
सगळ्यांना आत टाकेल असा दम टाकत मनोरमा खेडकरांनी पोलिस कारवाईला मज्जाव केला. एवढ्यावरच न थांबता मनोरमा खेडकरांनी आतून गेटला कुलूप लावत माध्यमांच्या कॅमेऱ्यांनाही चित्रीकरणास विरोध केला. एकूणच लेकीचे अनेक उद्योग समोर येत असताना आईचा मस्तवालपणाही समोर आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





