इंदापूर : न्यूज कट्टा
इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. कारखान्याचे संस्थापक आणि राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सलग पाचव्यांदा या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करत आपले वर्चस्व कायम राखले आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ उमेदवारी अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी १९९९ मध्ये नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. तेव्हापासून या कारखान्याच्या सर्व निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ४६ गावांचा समावेश आहे. आज या कारखान्याच्या सन २०२५ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये २१ जागांसाठी २१ जणांचे उमेदवारी अर्ज ठेवण्यात आले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीकरिता सहकार्याची भूमिका घेतल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच येणाऱ्या काळात कारखान्याचा कारभार अधिक पारदर्शक पद्धतीने करून सभासदांच्या उसाला चांगला दर देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :
- बावडा गट : हर्षवर्धन शहाजीराव पाटील, प्रतापराव सर्जेराव पाटील, उमेश अच्युतराव पाटील
- पिंपरी गट : प्रकाश शहाजी मोहिते, संजय तुळशीराम बोडके, विजय दत्तात्रय घोगरे
- सुरवड गट : महेशकुमार दत्तात्रय शिर्के, दादासो उत्तम घोगरे, सुभाष किसन गायकवाड
- काटी गट : लालासो देविदास पवार, राजकुमार वसंतराव जाधव, विलास रामचंद्र वाघामोडे
- रेडणी गट : आनंदराव नामदेव बोंद्रे, राजेंद्र व्यंकट देवकर, दत्तू यशवंत सवासे
- अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्ग : राहुल अरुण कांबळे
- इतर मागास प्रवर्ग : कृष्णाजी दशरथ यादव
- भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग : रामचंद्र नामदेव नाईक
- ब वर्ग सभासद प्रवर्ग : भाग्यश्री हर्षवर्धन पाटील
- महिला राखीव प्रवर्ग : संगिता दत्तात्रय पोळ, कल्पना निवृत्ती शिंदे
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार जीवन बनसोडे यांनी काम पहिले.
उदयसिंह पाटील यांची अखेरच्या क्षणी निवडणुकीतून एक्झिट
विद्यमान संचालक उदयसिंह पाटील यांनी आज अचानकपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. कारखान्यांची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी त्यांनी शेवटच्या क्षणी आपला बावडा गटातील उमेदवारी अर्ज मागे घेत मनाचा मोठेपणा दाखवला. हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय संघर्षाच्या काळात कारखान्याची निवडणूक होणे हे योग्य नव्हते. त्यामुळे आपण माघार घेतल्याचं उदयसिंह पाटील यांनी सांगितलं. त्यावर हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याच्या पहिल्याच संचालक मंडळ बैठकीत उदयसिंह पाटील यांना तज्ञ संचालक म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली.





