इंदापूर : न्यूज कट्टा
बारामतीत एका महाविद्यालयाच्या आवारात महाविद्यालयीन युवकांची हत्या झाल्याचा प्रकार ताजा असतानाच इंदापूर येथेही एका महाविद्यालयासमोर एका युवकावर गोळीबार झाला आहे. यामध्ये संबंधित युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर इंदापूरमध्ये खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राहुल चव्हाण असं या जखमी युवकाचं नाव असून तो इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर इंदापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत संबंधित युवकाला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत माहिती अशी की, राहुल चव्हाण हा इंदापूर महाविद्यालयाच्या परिसरात असताना दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर तीन ते चार राऊंड फायर केले.
या घटनेत तीन राऊंड लागल्यामुळे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर इंदापूरमध्ये एकच खळबळ उडाली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. आज सकाळीच बारामतीत एका महाविद्यालयीन युवकाचा खून झाला आहे. त्यानंतर अवघ्या तासानंतर इंदापूरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे.





