इंदापूर : न्यूज कट्टा
शेतात लावलेल्या मका पिकामध्ये बेकायदेशीरपणे अफूच्या झाडांची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर तालुक्यातील व्हावी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी वालचंदनगर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल २७ लाख ५६ हजार रुपये किमतीची अफूची बोंडे आणि झाडे जप्त करण्यात आली आहेत. तसेच अफूची शेती करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
रतन कुंडलिक मारकड (वय ५०), बाळु बाबुराव जाधव (वय ५४), कल्याण बाबुराव जाधव (वय ६५, तिघेही रा. न्हावी ता. इंदापूर जि. पुणे) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात अफूची शेती करण्यात येत असल्याची बाब पोलिसांच्या कारवाईत समोर आली आहे. त्यांच्याकडून २७ लाख ५६ हजार ४६० रुपये किमतीच्या ८८३ किलो अफूच्या बोंडासह अफूची झाडेही जप्त करण्यात आली आहेत.
इंदापूर तालुक्यातील न्हावी गावाच्या परिसरामध्ये अफूची शेती केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार स्वप्नील अहिवळे यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर वालचंदनगर पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी सकाळी न्हावी येथे छापा टाकण्यात आला. त्यामध्ये येथील काही शेतकऱ्यांनी मका, तर काहींनी कांदा व लसूण पिकामध्ये अफूचे आंतरपीक घेतल्याचे आढळून आले. पोलिसांनी परिसरात आणखी अफूची शेती आढळते का याचाही शोध घेतला.
या प्रकरणी रतन मारकड, बाळु जाधव, कल्याण जाधव या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर वालचंदनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८ ब, १५, १८, ३२,४६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीत आंतरपीक म्हणून अफूची लागवड केल्याचा प्रकार उघड झाल्यामुळे इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अशा प्रकारच्या कृत्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, कुलदीप संकपाळ, राहुल गावडे, पोलीस अंमलदार स्वप्निल अहीवळे, बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, अजय घुले, ईश्वर जाधव, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, दगडु विरकर, आसिफ शेख, रामदास बाबर, बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, महेश बनकर, अतुल डेरे, मंगेश थिगळे, विभीषण सस्तुरे, पो.स.ई. विजय तेळकीकर, पोलीस अंमलदार रविंद्र पाटमास, बापू मोहिते, गुलाब पाटील, शरद पोफळे, विक्रमसिंग जाधव, अभिजीत कळसकर, गणेश बनकर, महिला पोलीस अंमलदार स्मिता गायकवाड, मेघा शिंदे यांनी ही कारवाई केली.





