इंदापूर : न्यूज कट्टा
इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीने भरत शहा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करताच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या प्रदीप गारटकर हे जिल्हाध्यक्षपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत इंदापूरच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत यावर्षी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाला अल्टीमेटम देत पक्ष आम्हाला कोलणार असेल, तर आम्हीही पक्षाला कोलू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतरही पक्षाने गारटकर यांचा विरोध डावलून भरत शहा यांच्या उमेदवारीचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळं आता प्रदीप गारटकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेत इंदापुरच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
आपण पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील होतो. मात्र पक्षाने ज्यांचा प्रवेशही झाला नाही, अशा लोकांना उमेदवारी निश्चित केली. त्यामुळं आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं प्रदीप गारटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. उद्या आपण पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असून त्यानंतर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
दरम्यान, गारटकर यांच्या उमेदवारीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्यासह अन्य पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. इंदापूरच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह सर्वच नगरसेवक स्थानिक आघाडीचे निवडून येतील असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गारटकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.





