इंदापूर : न्यूज कट्टा
जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे उद्या दि. २ जुलै रोजी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडणार आहे. आज इंदापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत प्रवीण माने यांनी याबाबत माहिती दिली.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर प्रवीण माने यांनी शरद पवार गटात सक्रिय सहभाग घेतला होता. लोकसभा निवडणुकीत मात्र ते अजित पवार गटात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवत जवळपास ३९ हजार मते मिळवली होती. विधानसभा निवडणुकीनंतर ते भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती.
यादरम्यान, प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश निश्चित केला आहे. उद्या बुधवार दि. २ जुलै रोजी मुंबईत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. प्रवीण माने यांच्यासोबत मयूरसिंह पाटील, संजय निंबाळकर यांच्यासह इंदापूर तालुक्यातील प्रमुख आजी-माजी पदाधिकारी प्रवेश करणार आहेत.
मुंबईत औपचारीक प्रवेश होणार आहे. मात्र त्यानंतर इंदापूरमध्ये भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. या मेळाव्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रित केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही यावेळी मयूरसिंह पाटील यांनी दिली.





