INDAPUR CRIME : गुन्हा मागे घ्यावा म्हणून कुटुंबावर केले कोयत्याने वार; इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना

इंदापूर : न्यूज कट्टा

गुन्हा मागे घेण्याची धमकी देत पती-पत्नीवर कोयत्याने वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथे घडली आहे. या घटनेत एकजण गंभीर जखमी असून या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर गजरे, राजेश मोरे, हिरा गजरे, विनोद मोरे आणि गणेश परदेशी (सर्व रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) यांच्यावर भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मालन ऊर्फ रेश्मा शहाजी काळे (रा. तक्रारवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, गुरुवार दि. २३ जानेवारी रोजी सकाळी फिर्यादी मालन काळे, त्यांचे पती शहाजी व मुलगा अजय हे होडीतून उजनी पाणलोट क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते.

यावेळी संबंधित आरोपी होडीतून त्यांच्याजवळ आले. आमच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्या, असे म्हणत किशोर गजरे, राजेश मोरे आणि इतर साथीदारांनी शहाजी काळे यांच्या पाठीवर कोयत्याने वार केले. यामध्ये शहाजी काळे हे गंभीर जखमी झाले आहेत.या दरम्यान, त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मालन यांच्याही उजव्या मनगटावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. एवढ्यावरच न थांबता या सर्वांनी पती-पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मुलाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

त्यानुसार भिगवण पोलिसांनी या पाच जणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच बेकायदेशीर जमाव जमवणे, हत्यार घेऊन दंगल माजवणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!