इंदापूर : न्यूज कट्टा
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा राजीनामा देत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. उद्या इंदापूर शहरातील बाजार समिती आवारात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, या सोहळ्यातच हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होणार का याकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी मागील विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश करत कमळ चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. त्यानंतर भाजपकडून हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन केलं जाईल, अशी शक्यता होती. मात्र अनेकदा त्यांना हुलकावणी मिळाली. दुसरीकडे गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंदापूरमधून विधानसभेला उमेदवारी कोणाला याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या.
विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी द्यायची असं महायुतीचं सूत्र ठरल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळेल याबाबत साशंकता होती. अशातच हर्षवर्धन पाटील यांनी थेट शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी इंदापूर येथील बाजार समिती आवारात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार..?
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांना प्रवेश दिला तरी उमेदवारी देऊ नये अशी मागणी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. त्यातच हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष प्रवेशाची घोषणा केल्यानंतरही नाराजीची भावना व्यक्त केली गेली. त्यामुळे उद्या पक्ष प्रवेशानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होणार का याकडे लक्ष लागले आहे.





