बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा
बारामतीत मागील काही काळात मायाजाल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दामदुप्पट रक्कम देण्याचं आणि शेअर मार्केटमधून मोठी रक्कम मिळवून देण्याचं आमिष दाखवत अनेकांना लाखो रुपयांना चुना लावल्याची प्रकरणे बारामतीत घडली आहेत. विशेष म्हणजे, संबंधितांना गुंतवणुकीसाठी राजी करणारे लोक राजरोसपणे बारामतीत फिरतात. मात्र पोलिस यंत्रणेकडून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळं गुंतवणूकदार हतबल झाले आहेत.
बारामतीचा विस्तार वाढत असतानाच अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. त्याचवेळी बारामती एज्युकेशनल हब बनली असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बारामतीत शिक्षण घेत आहेत. त्याचवेळी बारामती एमआयडीसीचा विस्तारही वाढला असून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळं साहजिकच बारामतीतील स्थानिक व्यवसायही भरभराटीला लागला आहे. मात्र हीच संधी हेरून लोकांना दामदुप्पट रक्कम देण्याचे आणि शेअर मार्केटमधून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांना अक्षरश: गंडा घालण्याचं काम वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने होत आहे.
तुम्ही आज इतकी रक्कम गुंतवा, तुम्हाला महिन्याला इतकी रक्कम मिळेल. नंतर तुम्ही आमच्यासोबत आणखी लोक जोडले तर तुम्हाला अधिकचा फायदा होईल अशी बतावणी संबंधितांकडून केली जाते. सुरुवातीला लगेच कुणी गुंतवणूक करायला तयार होत नाही. मात्र संबंधित कंपन्यांकडून महागड्या ठिकाणी कार्यक्रम ठेवून लोकांचा कसा फायदा झाला, तुम्हाला किती फायदा होईल हे पटवून दिले जाते. अशा एक-दोन कार्यक्रमानंतर संबंधित कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी पुन्हा गुंतवणूकदाराला भेटतात.
दरम्यानच्या काळात गुंतवणूकदारांची मानसिकता बदललेली असते आणि त्यांच्याकडून मग अधिकची रक्कम गुंतवण्यावर भर दिला जातो. रक्कम गुंतवल्यानंतर सुरुवातीला काही दिवस नियमित परतावा रक्कम मिळत असल्यानं संबंधित गुंतवणूकदार आपल्या परिचितांना याची माहिती देऊन त्यांनाही गुंतवणुकीस भाग पाडतात. काही महीने गेल्यानंतर मात्र कंपनीची वेबसाईटच बंद झालेली असते किंवा स्थानिक प्रतिनिधी गुंतवणूकदाराला टाळत असतात. तेव्हा कुठे आपली फसवणूक झाल्याची कल्पना संबंधितांना येते. हा झाला वेगवेगळ्या कंपन्यांकडून होणाऱ्या फसवणुकीचा प्रकार.
आजही बारामतीत अनेकजण अशा प्रकाराला बळी पडले आहेत. परंतु त्यांना न्याय मिळत नसल्याने ते हतबल झाले आहेत. फसवणूक झाल्यानंतर सगळ्यात आधी गुंतवणूकदार पोलिस ठाण्याचे दार ठोठावतात. मात्र पोलिस प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे निराश होण्याशिवाय या गुंतवणूकदारांकडे पर्याय उरलेला नाही. बारामतीत अनेक कंपन्यांनी अशा पद्धतीने फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे, या कंपन्यांचे स्थानिक प्रतिनिधी काहीच झाले नाही अशा अविर्भावात वावरत आहेत.
अनेकांची पोलिसांत धाव; कारवाई मात्र शून्य
बारामतीत घडलेल्या फसवणुकीच्या प्रकारांबाबत काहींनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. रीतसर तक्रारी अर्ज केले. मात्र त्यावर आजवर काहीच कारवाई झालेली नाही असेच चित्र आहे. काहींना तर तुम्ही ग्रामीण पोलिस ठाण्यात जा, तुम्ही शहर पोलिस ठाण्यात जा असं सांगितलं जातं. आधीच मोठी रक्कम अडकल्याचा ताण आणि त्यात न्यायाची अपेक्षा असलेल्या पोलिस यंत्रणेकडून होणारी हेळसांड अशा दुहेरी तणावात वावरणाऱ्या गुंतवणूकदारांना न्याय मिळेल का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे.





