बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा
दीड वर्षात तीनपट परताव्याचं आमिष दाखवत ब्लॉक ऑरा या कंपनीने अनेकांना गंडा घातला आहे. या प्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु बारामतीत याबाबत तक्रार देण्यासाठी गेलेल्या गुंतवणूकदारांना वेगळेच अनुभव आले. बारामती शहर पोलिस ठाणे, बारामती तालुका पोलिस ठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, अप्पर पोलिस अधीक्षक अशा अनेक ठिकाणी हेलपाटे मारूनही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळं इतरत्र गुन्हे दाखल असताना बारामतीच्या पोलिस यंत्रणेला गुन्हा दाखल करण्याची अडचण काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे.
बारामतीतील एस. ए. काझी या गुंतवणूकदारांनी कंपनीचे सेमिनार आणि स्थानिक प्रतिनिधींच्या रेट्यामुळे काही रक्कम गुंतवली. सुरुवातीला कंपनीकडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर त्यांची रक्कम वाढत असल्याचं दिसलं. कालांतराने या रकमेत मोठी वाढ झाल्यानंतर कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधींनी त्यांना आणखी रक्कम गुंतवा असा तगादा लावला. त्यानंतर काझी यांना नवीन युझर आयडी, पासवर्ड देण्यात आला. त्यानुसार काझी यांनी आपली नफ्याची रक्कमही गुंतवली.
सुरुवातीचे काही दिवस जाताच या कंपनीच्या वेबसाईटमध्ये बिघाड होऊ लागला. त्यावेळी स्थानिक प्रतिनिधी असलेल्या विजयकुमार गायकवाड, नंदकूमार दुधे, प्रणव दुधे, अनिल जगताप, राजेंद्र कुंभार आणि नंदन पवार यांनी त्यांना काही दिवसात वेबसाईट सुरू होईल, काळजी करू नका असे सांगितले. काही दिवसांत ही वेबसाईट पूर्ववत सुरू झाली. परंतु काहीच दिवसांत ही वेबसाईट पूर्णपणे बंद पडली.
वेबसाईट बंद पडल्यानंतर काझी यांनी स्थानिक प्रतिनिधींकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र लवकरच तुमचे पैसे मिळतील, वेबसाईट पुन्हा सुरू होईल. सर्व काही सुरळीत होईल असं सांगत स्थानिक प्रतिनिधींनी त्यांची समजूत काढली. परंतु जसजसा काळ जाऊ लागला, तसं या स्थानिक प्रतिनिधींनी काझी यांना प्रतिसाद देणं बंद केलं. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही कुणाला भीत नाही अशी भाषा या लोकांकडून वापरली जाऊ लागली.
आपण काही लाख रुपयांना पुरते फसवले गेलो आहोत, हे लक्षात आल्यानंतर काझी यांनी बारामती शहर पोलिस ठाणे, बारामती तालुका पोलिस ठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, अप्पर पोलिस अधीक्षक अशा सर्व ठिकाणी न्यायासाठी दाद मागितली. मात्र आजवर त्यांना कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. उलट हे आमच्या हद्दीत येत नाही, तुम्ही दुसऱ्या पोलिस ठाण्यात जा, तुम्ही इकडे नाही तिकडे जा अशीच कारणं त्यांना पोलिस यंत्रणेकडून ऐकायला मिळाली.
वास्तविक, ब्लॉक ऑरा कंपनीच्या फसवणुकीबद्दल हडपसर पोलिस ठाण्यासह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे बारामतीतील पोलिस यंत्रणेने गुन्हा दाखल करून याचा तपास सुरू करणे अपेक्षित होते. त्याचवेळी स्थानिक प्रतिनिधींची चौकशी करून पुढील प्रक्रिया राबवणे आवश्यक होते. मात्र बारामतीतील पोलिस यंत्रणेकडून अशा कोणत्याच गोष्टी झालेल्या नाहीत. पोलिस यंत्रणा काहीच करत नसल्यामुळे या कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी ऐशोआरामात फिरत आहेत.
या कंपनीशी संबंधित असलेल्या बारामतीतील प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड, नंदकूमार दुधे, प्रणव दुधे, अनिल जगताप, राजेंद्र कुंभार आणि नंदन पवार यांच्या अनेक सुरस कथा आता पुढे येत आहेत. काहीजण संगणक प्रशिक्षण, विक्री व्यवसायात, तर कोणी पतसंस्थेत नोकरी करत आपले जीवन जगत आहे. या लोकांची चौकशी केली, तर अनेकांना दिलासा मिळू शकतो. मात्र पोलिसच दखल घेत नसल्यामुळे ज्या लोकांची फसवणूक झाली, ते आजही आपल्या पैशांसाठी ठिकठिकाणी खेटे घालत आहेत.





