जामखेड : न्यूज कट्टा
इर्टीगा कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकून सीएनजी गॅसच्या स्फोटात दोनजणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जामखेड शहरातील बीड रस्त्यावरील नवले पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्यासह व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे.
जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल आणि व्यावसायिक महादेव दत्ताराम काळे या दोघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. गुडवाल आणि काळे हे दोघेही बीडवरुन जामखेड येथे येत असताना त्यांच्या इर्टीगा कारची दुभाजकाला धडक बसली. त्यानंतर ही कार काही अंतरापर्यंत फरफटत गेली आणि सीएनजीचा स्फोट झाला.
अत्याधुनिक यंत्रणा असल्यामुळे ही कार लॉक झाली. त्यामुळं कारमधील दोघांचाही आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जामखेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या आगीची भिषणता इतकी होती की त्यामध्ये मृत पावलेल्या दोघांची ओळख पटवणे अवघड झाले होते.





