बारामती : न्यूज कट्टा
वेगवेगळ्या घटनांचे वृत्तांकन करतानाच समाजातील उपेक्षितांना न्याय देण्याचं काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा नुकताच बारामतीत पार पडला. स्व. नामदेवराव नालंदे प्रतिष्ठानच्या माध्यमातून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये बारामती व परिसरातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.
बारामती येथील ज्येष्ठ नागरिक संघात स्व. नामदेवराव नालंदे यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. पुण्याचे पोलिस उपायुक्त गणेश इंगळे, बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव जोशी, दीपक वाबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी कै. नामदेवराव नालंदे जीवनगौरव पुरस्कार (मरणोत्तर) कै. द. रा. पवार यांना तसेच पळशी येथील पत्रकार काशीनाथ पिंगळे यांना देण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे प्रमुख योगेश नालंदे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद करत प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डिजीटल युगात पत्रकारांनीही स्वत:मध्ये बदल घडवले पाहिजेत असे आवाहन गणेश बिरादार यांनी केले. अनेक घटना पत्रकारांच्या सतर्कतेमुळे उघड होतात. त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजहिताची पत्रकारिता साध्य होत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
गणेश इंगळे यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा म्हणून काम करणारा एक घटक असून नामदेवराव नालंदे प्रतिष्ठानने या पत्रकारांचा सन्मान करत त्यांना प्रोत्साहित करण्याचे महत्वपूर्ण कार्य केल्याचे सांगितले. नानासाहेब साळवे, प्रशांत नालंदे, मेघराज नालंदे, किरण हिवरे, प्रदीप ढुके आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. चंदूकाका सराफ यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.





