खेड : न्यूज कट्टा
खेड तालुक्यातील पाईट पापळवाडी येथील कुंडेश्वर दर्शनासाठी महिला भाविकांना घेऊन निघालेल्या पिकअप जीपचा भीषण अपघात झाला आहे. शंभर फूट खोल दरीत जीप कोसळून झालेल्या या अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाला आहे.तर अनेक महिला भाविक जखमी झाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शोभा ज्ञानेश्वर पापळ, सुमन काळूराम पापळ, शारदा रामदास चोरगे, मंदा कानिफ दरेकर, संजीवनी कैलास दरेकर, मिराबाई संभाजी चोरगे, बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर, शकुंतला तानाजी चोरघे या महिलांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाईट पापळवाडी परिसरातून महिला भाविक पिकअप जीपने कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघाल्या होत्या. यावेळी पाईट येथे अचानक मागे जीप आली आणि शंभर फूट खोल दरीत कोसळली.
या पिकअप जीपमध्ये सुमारे २५ ते ३० महिला बसलेल्या होत्या. यातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर २५ महिला गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलांवर राजगुरुनगर येथील खासगी रुग्णालय आणि चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भीषण अपघातात अनेक महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महाळुंगे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. दुसरीकडे, या घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली असून रुग्णालयासह अपघातस्थळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली.





