पन्नास लाखांची लाच मागणं भोवलं; भूमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित

पुणे : न्यूज कट्टा  

पुण्यातील हवेली येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एका व्यापाऱ्याकडे ५० लाखांची लाच मागून नंतर त्याच्या जमिनीची चुकीची ‘क’ प्रत बनवल्याच्या प्रकरणात अमरसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हवेली येथील भूमी अभिलेख कार्यालयात अमरसिंह पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून हे कार्यालय चर्चेत आले होते. नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणे, कोणत्याही कामासाठी पैसे मागणे, पैशांसाठी मोजणीत गोंधळ निर्माण करणे असे प्रकार सातत्याने घडत होते. अमरसिंह पाटील यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अक्षरश: लोकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू केले होते.

एका व्यापाऱ्याने हडपसर येथील मिळकतीची शासकीय शुल्क भरून मोजणी करून घेतली होती. त्यानंतर या मिळकतीची हद्द निश्चित करण्यासाठी संबंधित तक्रारदार हे हवेली भूमी अभिलेख कार्यालयात पाठपुरावा करत होते. या दरम्यान, त्यांना भूमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील या अधिकाऱ्याने हद्द निश्चित करण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. तर मोजणी अधिकारी किरण येटाळे याने २५ लाख रुपयात हे काम करून देतो असं सांगितलं.

तसेच तुम्ही रक्कम दिली नाही तर अमरसिंह पाटील हा अधिकारी हेलिकॉप्टर शॉट लावेल अशी धमकी देत मालमत्तेचं नुकसान करण्याची भीती घातली. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या मिळकतीलगतच्या जमिनींची चुकीची ‘क’ प्रत तयार केली. त्यामुळं तक्रारदाराला अक्षरश: मानसिक आणि आर्थिक सोसावा लागला. त्यानंतर या व्यापाऱ्याने थेट महसूलमंत्र्यांकडे या प्रकाराची तक्रार केली होती.

त्यानंतर येरवडा पोलिसांनी अमरसिंह पाटील आणि किरण येटाळे या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. आता राज्य शासनाने अमरसिंह पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे महसूल विभागासह भूमी अभिलेख विभागात एकच खळबळ उडाली असून अमरसिंह पाटील यांच्यापुढील अडचणी आता वाढल्या आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!