फलटण : न्यूज कट्टा
माळेगाव कारखान्यात मी चेअरमन होणार म्हटल्यावर विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळं त्यांच्याकडून काहीही आरोप केले जात आहेत. वास्तविक मी चेअरमन झाल्यानंतर कारखाना कसा चालवतो, सलग पाच वर्षे उच्चांकी दर कसा देतो आणि संपूर्ण कामकाजात काटकसर कशी करतो हेच मला दाखवून द्यायचे असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
माळेगाव कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील सांगवी येथे निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित शेतकरी मेळाव्यात अजितदादांनी माळेगावचे चेअरमनपद घेण्यामागचा प्लॅन सांगितला. मी कारखान्याचा चेअरमन होणार म्हटल्यानंतर अनेकांना पोटदुखी व्हायला लागली आहे. आम्ही खासगी कारखानदारीचं समर्थन करतो असं म्हणतात. हे धांदांत खोटं असून असं असेल तर बारामतीतील माझ्या नेतृत्वात चाललेल्या सहकारी संस्थांची प्रगती कशी झाली..? असा सवालही उपस्थित केला.
माळेगाव कारखान्याचं चेअरमनपद घेण्यामागे माझा हेतू स्वच्छ आहे. मला या माध्यमातून पाच वर्षात सर्वाधिक दर कसा देतो, कारखान्याचा कारभार काटसकरीने कसा करतो हे सगळं दाखवून द्यायचं असल्याचं अजितदादांनी नमूद केलं. मी चेअरमन असल्यानंतर मीच जर कारखान्याची कोणतीही सुविधा वापरली नाही, तर इतर संचालकही त्याचंच अनुकरण करतील. त्यातून कारखान्याचाच खर्च वाचेल आणि सभासदांना अधिकचा दर देणं शक्य होणार आहे. त्यामुळं विरोधकांनी काहीही सांगितलं तरी त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहनही त्यांनी केलं.
सभासदांच्या पैशाला हात न लावता या परिसराचा कायापालट करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्यामुळं या निवडणुकीत तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही पुढची पाच वर्षे तुम्हाला राज्यात सर्वात उत्तम कारखाना चालवून दाखवू असं त्यांनी सांगितलं. आमच्या पॅनलची सत्ता आल्यानंतर चेअरमन मी होणार हे जाहीर केलं आहे. आता इतर तीन पॅनलनी त्यांचा चेअरमन कोण हे जाहीर करावं. मात्र ते यावर काहीच बोलत नाहीत. त्यामुळं तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची धमक असलेलंच संचालक मंडळ निवडून द्या असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
ऊसतोडणी नियोजन, पारदर्शक भरती करतानाच कारखान्याचा एकही रुपया वायपट जाणार नाही याची शाश्वती देत अजितदादांनी सभासदांच्या ऊस गाळपाला प्राधान्य देतानाच आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकऱ्यांचीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असंही आश्वस्त केलं.





