बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवार दि. २१ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. काल जवळपास १२ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर गुरुवारी दिवसभरात ६९ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २२ जून रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून दि. २७ मेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी १२ जणांचे अर्ज दाखल झाले. त्यानंतर दि. २२ मे रोजी दिवसभरात ६९ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत.
या दोन्ही दिवसांत नवीन इच्छुकांसह विद्यमान संचालकांचेही उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २७ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्यामुळे आणखी किती अर्ज दाखल होतात याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, माळेगाव कारखान्याची निवडणूक नेहमीच चुरशीची होत असते. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधी गटातून कुणाला संधी मिळते याचीही कार्यक्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.





