बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलचे पणदरे गटातील तीनही उमेदवार आघाडीवर आहेत. सद्यस्थितीत निळकंठेश्वर पॅनलच्या जवळपास १० उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीची आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला ब वर्ग प्रवर्गाची मोजणी झाली. त्यामध्ये अजितदादांचा मोठ्या फरकाने विजय झाला. त्यानंतर अ वर्ग प्रवर्गातील मोजणीला सुरुवात करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून रतनकुमार भोसले, इतर मागास प्रवर्गातून नितीन शेंडे, भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून विलास देवकाते, महिला राखीवमधून संगीता कोकरे, माळेगाव गटातून बाळासाहेब तावरे, शिवराज जाधवराव, राजेंद्र बुरुंगले हे उमेदवार पहिल्या फेरीअखेर आघाडीवर आहेत. तर सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या राजश्री कोकरे या काही मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत.
सद्यस्थितीत पणदरे गटातून योगेश जगताप, तानाजी कोकरे, स्वप्नील जगताप हे तीनही उमेदवार आघाडीवर आहेत. या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली असून निळकंठेश्वर पॅनलची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालं आहे.





