बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराला अवघे तीन दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ आज बुधवार दि. १८ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं अजितदादांनी आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना सडेतोड उत्तरे देतानाच सभासदांनाही पुढील पाच वर्षात उजवी कामगिरी करून दाखवण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळं आजच्या सभेतून अजितदादा काय बोलतात याकडे कार्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवार दि. २२ जून रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. प्रचाराला आता अवघे तीन दिवस उरल्यामुळे उमेदवारांनी मतदारांशी अधिकाधिक संपर्क साधण्यावर भर दिला असून आपल्यालाच निवडून देण्याचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान, आज निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.
आज पहिली सभा दुपारी ३ वाजता खांडज येथील श्रीनाथ मंगल कार्यालयात होणार आहे. दुसरी सभा शिरवली येथील जानुबाई मंदिरात सायंकाळी ४.३० वाजता होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता कांबळेश्वर येथील संगम लॉन्स येथे तिसरी सभा होणार आहे. तर पणदरे एमआयडीसी येथील साई मंगल कार्यालयात सायंकाळी ७.३० वाजता चौथी सभा होणार आहे.
माळेगाव कारखाना निवडणुकीत स्वत: अजितदादांनी ब वर्गातून आपली उमेदवारी निश्चित करत कारखान्याचे अध्यक्षपद स्वत:कडेच ठेवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं या निवडणुकीत रंगत वाढली असून अजितदादांनी कारखान्याचं अध्यक्षपद घेतल्यास सभासदांना उच्चांकी दर मिळण्याबरोबरच कारखान्याच्या माध्यमातून अधिकाधिक योजना राबवल्या जातील असा विश्वास सभासदांना वाटतो. त्यामुळं कारखान्याच्या निवडणुकीचा रंगच पालटला असून आज होत असलेल्या सभांमध्ये अजितदादा काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





