बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र अद्याप दोन्ही बाजूंनी उमेदवारांची यादी जाहिर झालेली नाही. त्यामुळे आज दिवसभरात उमेदवार यादी जाहिर होते की बिनविरोध निवडणुकीची घोषणा होते याकडेच कार्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी दि. २२ जून रोजी मतदान पार पडत आहे. ही निवडणुक बिनविरोध होईल अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. प्रत्यक्षात मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री निळकंठेश्वर पॅनल आणि माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेतृत्वात सहकार बचाव शेतकरी पॅनलकडून कार्यक्षेत्रात प्रचार सुरु करण्यात आला आहे.
या दरम्यान, दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. असं असलं तरी कारखान्याची निवडणुक बिनविरोध होईल अशाही चर्चा झडत आहेत. त्यामुळं आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करत थेट या निवडणुकीत प्रवेश केला आहे. त्यामुळं ही निवडणुक चुरशीची होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. विशेष म्हणजे, माळेगावच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी विशेष रणनिती आखण्यास सुरुवात केली असून त्या दृष्टीने त्यांचे बारामतीत दौरेही वाढल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान, काल अजितदादांनी बारामतीत थांबत माळेगावच्या निवडणुकीबाबत बैठका घेतल्या. या दरम्यान उमेदवारांचीही चाचपणी झल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच सहकार बचाव शेतकरी पॅनलनेही आम्ही सक्षम उमेदवार देवून पूर्ण ताकदीने निवडणुक लढवू असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळं दोन्ही बाजूंकडून उमेदवार यादी कधी जाहिर होते याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
अफवांचे पेव काही थांबेना
माळेगाव कारखान्याची निवडणुक बिनविरोध होईल अशा अफवा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, अजितदादा आणि चंद्रराव तावरे यांच्यात समझोता झाल्यामुळे उमेदवार यादी जाहिर झाली नसल्याची अफवाही पसरली आहे. त्यामुळं सभासदांसह इच्छुकही संभ्रमात आहेत.
वास्तविक या निवडणुकीत उमेदवार जाहिर होण्यापूर्वीच प्रचाराने वेग घेतला आहे. त्यात एकमेकांवर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र असं असलं तरी राजकारणात काहीही अशक्य नसतं. त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल हेही सांगता येत नसल्यानं सध्या सर्वचजण वेट ॲन्ड वॉच या भुमिकेत असल्याचं पहायला मिळतं.





