नारायणगाव : न्यूज कट्टा
पुणे- नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथील मुक्ताई धाब्याजवळ आज सकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील आयशर टेम्पोने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो कारला जोरदार धडक दिली. त्यामध्ये मॅक्झिमो कारची पुढे थांबलेल्या एसटी बसला पाठीमागून धडक बसली. या विचित्र अपघातात नऊजणांचा मृत्यू झाला असून सातजण जखमी झाले आहेत.
या अपघातात देबुबाई दामू टाकळकर (वय ६५, रा. वैशखखेडे ता. जुन्नर), विनोद केरूभाऊ रोकडे ( वय ५०), युवराज महादेव वाव्हळ (वय २३), चंद्रकांत कारभारी गुंजाळ (वय ५७), गीता बाबुराव गवारे (वय ४५), भाऊ रभाजी बडे (वय ६५, सर्व रा. कांदळी, ता. जुन्नर), नजमा अहमद हनीफ शेख (वय ३५, रा.गडही मैदान, राजगुरुनगर) वशिफा वशिम इनामदार (वय ५) आणि मनीषा नानासाहेब पाचरणे (वय ५६, रा. १४ नंबर, कांदळी, ता. जुन्नर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे – नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळील मुक्ताई ढाब्यानजीक आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. सकाळी नाशिकहून पुण्याच्या मार्गाने जाणाऱ्या एसटी बसचा नारायणगावजवळ ब्रेक फेल झाला. त्यामुळे ती एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी मागून प्रवासी वाहतूक करणारी एक मॅक्झिमो गाडी येत होती. त्याच्या पाठीमागून एक आयशर ट्रक भरधाव वेगाने येत होता. भरधाव आयशरने प्रवासी असलेल्या मॅक्झिमो गाडीला भीषण धडक दिली. त्यानंतर मॅक्झिमो गाडी बंद पडलेल्या एसटीवर जोरात जाऊन आदळली. या मॅक्झिमो गाडीमध्ये जवळपास १३ प्रवासी होते. त्यातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरीक आणि पोलिसांनी तात्काळ मदतकार्याला सुरुवात केली. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयशर टेम्पो आणि बसच्या मध्ये आल्यामुळे मॅक्झिमो कार अक्षरश: चक्काचूर झाली आहे. या अपघातानंतर आयशर टेम्पो चालक फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.





