सोमेश्वरनगर : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने देशपातळीवर आपला ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीने ‘सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाना’ हा बहुमान सोमेश्वर कारखान्याने मिळवला आहे. गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये उत्पादन, आर्थिक आणि तांत्रिक कामगिरीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे.
दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती निमुबेन बंगानिया, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक आणि अधिकारी यांनी मिळून हा पुरस्कार स्विकारला. हा पुरस्कार मिळणे हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून मिळालेल्या चार पुरस्कारांनंतर, राष्ट्रीय पातळीवरचा हा पहिलाच पुरस्कार सोमेश्वरला मिळाल्यामुळे आमच्यावरील जबाबदारी वाढली आहे. येणाऱ्या काळातही कारखान्याशी संबंधित घटकांच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध राहू असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे मार्गदर्शक अजितदादा पवार यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन आणि कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व सभासदांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यापुढेही नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासात मोलाचे योगदान देईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.





