यवत : न्यूज कट्टा
पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत बेपत्ता झालेल्या यवत पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक निखिल रणदिवे यांचा दोन दिवसांनंतरही शोध लागलेला नाही. उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस हे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांना वाचवत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनीच आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी रणदिवे कुटुंबीयांनी केली आहे.
यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख हे जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप करत पोलिस नाईक निखिल रणदिवे हे शुक्रवारपासून बेपत्ता झाले आहेत. यवत पोलिसांच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र दोन दिवस उलटूनही या कर्मचाऱ्याचा शोध लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर रणदिवे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करत मदतीची याचना केली आहे.
निखिल रणदिवे यांच्या प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस हे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांना वाचवत आहेत. त्यामुळं या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडून काढून अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवावा अशी मागणी रणदिवे कुटुंबाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गेल्या वर्षभरापासून पोलिस निरीक्षक नारायण देशमुख हे निखिल रणदिवे यांचा छळ करत होते. त्यांच्या त्रासामुळेच माझ्या पतीवर आत्महत्येची वेळ आल्याचं नमूद करत अक्षदा रणदिवे यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.





