फलटण : न्यूज कट्टा
फलटण तालुक्यातील ठाकूरकी येथील एका युवकाचा खून करून त्याचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या युवकाच्या अंगावर ठिकठिकाणी गंभीर जखमा असून गुप्तांगही अर्धवट कापण्यात आलं आहे. या घटनेनंतर फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला आणि कुणी केला याचा शोध फलटण शहर पोलिस घेत आहेत.
संदीप मनोहर रिटे (वय ३५, रा. ठाकूरकी, ता. फलटण) असं या युवकाचं नाव आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संदीप आणि त्याची पत्नी सोनाली हे दोघेही फलटण शहरातील विमानतळ परिसरात नाना-नानी पार्क येथे कामाला होते. मंगळवारी दि. १० जून रोजी संदीप हा आपल्या पत्नीला माहेरी सोडून कामावर निघून गेला. त्यानंतर सायंकाळी ७ वाजून गेल्यानंतरही तो परतला नाही.
बुधवारी दि. ११ जून रोजी संदीप कामावर येणार आहे का याबाबत कामाच्या ठिकाणावरून विचारणा झाली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी संदीपचा शोध घेण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी चौकशी करूनही तो मिळून आला नाही. त्यामुळं कुटुंबीयांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. या दरम्यान, पोलिसांना ठाकूरकी गावाच्या हद्दीत एका अज्ञात युवकाचा अर्धवट पुरलेल्या स्थितीतील मृतदेह मिळून आला. पोलिसांनी सोनालीसह तिच्या नातेवाईकांना या प्रकाराची माहिती देऊन संबंधित घटनास्थळी नेले. त्यावेळी सोनालीने हा आपल्या पतीचा मृतदेह असल्याचं सांगितलं.
संदीपच्या डोक्यावर, गळ्यावर गंभीर जखमा झालेल्या होत्या. तसेच त्याचे गुप्तांग अर्धवट कापून टाकण्यात आले होते. घटनास्थळी संदीपची दुचाकीही आढळून आली. त्यानुसार संदीपची पत्नी सोनाली हिने दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीवर फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर फलटण पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.





