फलटण : न्यूज कट्टा
कुटुंबातील वाटणीच्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. वाटणीच्या वादातून दोन नातवांनी कुऱ्हाडीने आणि दगडाने मारहाण करत आजोबांचा खून केल्याची घटना फलटण तालुक्यातील सालपे येथे घडली आहे. या प्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
सावता सरस्वती काळे (वय ७५) असं या घटनेत मृत पावलेल्या आजोबांचं नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सालपे येथील फिर्यादी मिथुन काज्या काळे याचे आजोबा सावता काळे यांचा फिर्यादीचे सावत्र भाऊ दत्ता काज्या काळे, महेश राजा काळे (वय १९, दोघे रा. सालपे ता. फलटण) तसेच दत्ता यांचा सासरा अमित लवऱ्या शिंदे (वय ३५, रा. मोड ता. खटाव) यांच्यांशी घराच्या वाटणीवरून वाद झाला.
या वादातून दत्ता काळे याने सावता काळे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. तर महेश काळे याने दगडाने मारहाण केली. यामध्ये सावता काळे यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत मिथुन काळे याने दिलेल्या फिर्यादीवरून लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी महेश काळे व अमित शिंदे या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले करीत आहेत.





