आळंदी : न्यूज कट्टा
आळंदीतील इंद्रायणी नदीत उडी मारून एका २० वर्षीय पोलिस महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी या महिला पोलिसाने आपल्या एका मित्राला फोन करत इंद्रायणी नदीत उडी मारली होती. तीन दिवसांच्या शोधानंतर आज तिचा मृतदेह सापडला आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
अनुष्का सुहास केदार (वय २०, रा. लक्ष्मीनारायणनगर, दिघी) असं या महिला पोलिसाचं नाव आहे. पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयात अनुष्का या नेमणुकीस होत्या. रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या नवीन पूलाजवळील गरुड खांबावरून उडी मारली होती. तत्पूर्वी आपल्या एका मित्राला फोन केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
अनुष्का केदार यांनी नदीत उडी मारल्यानंतर आळंदी पोलिसांनी तात्काळ अग्निशमन विभागाला पाचारण केलं. मात्र अंधार पडल्यामुळे शोधकार्यात अडथळा आला. त्यानंतर सोमवारी व मंगळवारी पुन्हा आळंदी पोलिस, आळंदी अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफच्या पथकाकडून शोधकार्य राबवण्यात आले. अखेर आज केदार यांचा मृतदेह आढळून आला आहे.
दरम्यान, अनुष्का केदार यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतेही कारण समोर आलेले नाही. पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे. मात्र या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.





