मुंबई : न्यूज कट्टा
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मंत्री व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला माजी मंत्री नवाब मलिक हेही उपस्थित होते. यावरून आता विरोधकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. आज पत्रकारांनीही याबाबत विचारणा केल्यानंतर अजितदादांनी ‘तुम्हाला का त्रास होतोय’ असं मिश्किल उत्तर देत एकाच वाक्यात हा विषय संपवला.
प्रत्येक मंगळवारी राष्ट्रवादीचे आमदार व मंत्री यांची बैठक अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर होत असते. सध्या सुरू असलेलं पावसाळी अधिवेशन आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालही देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. या बैठकीला अजितदादांसह पक्षाचे सर्व मंत्री, आमदार उपस्थित होते. माजी मंत्री नवाब मलिक हेही या बैठकीला उपस्थित होते.
नवाब मलिक यांच्या बैठकीतील उपस्थितीवरून आता विरोधकांनी सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आज विधानभवनात प्रवेश करताना पत्रकारांनीही अजितदादांना याबाबत विचारणा केली. त्यावर अजितदादांनी तुम्हाला काय त्रास होतोय अशा मिश्किल शब्दांत उत्तर दिलं.





