पुणे : न्यूज कट्टा
पुण्यातील कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत वास्तव्यास असलेल्या तरुणीवर कुरीयर बॉय बनून आलेल्या नराधमाने बलात्कार केल्याची घटना बुधवार दि. २ जुलै रोजी घडली होती. पुणे शहर पोलिसांनी तब्बल ४८ तासानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पीडिता व संबंधित तरुण यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं तपासात समोर आलं आहे. बॉयफ्रेंडने इच्छेविरुद्ध संबंध ठेवल्यामुळे पीडितेने बलात्काराची स्टोरी तयार करत पोलिसांकडे धाव घेतल्याचं समोर आलं आहे.
याबाबत माहिती अशी की, बुधवार दि. २ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी ही घरी एकटीच होती. त्या दरम्यान, या आरोपीने कुरीयर बॉय असल्याचं सांगून सोसायटीत प्रवेश केला. त्यानंतर तो पीडितेच्या फ्लॅटवर पोहोचला. त्याने दरवाज्यात उभं राहून तुमचं कुरीयर आलं आहे, असं त्या तरुणीला सांगितलं. त्यावर या कुरीयर बॉयने या तरुणीवर जबरदस्ती करत सही करण्यास भाग पाडले.
सही करण्यासाठी म्हणून या तरुणीने दरवाजा उघडल्यानंतर त्याने घरात प्रवेश करत पीडितेच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यामुळे पीडितेला भोवळ आली. त्याच अवस्थेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावर न थांबता त्याने मी पुन्हा येईन असा मेसेज तिच्या मोबाईलमध्ये लिहीत स्वत:चा सेल्फी काढत त्या ठिकाणाहून पोबारा केला अशी फिर्याद देण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहर हादरले होते. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात करण्यात आली होती.
पुणे पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीच्या शोधासाठी २० पथके तयार केली. सुरुवातीला दोन संशयितांना ताब्यातही घेण्यात आले होते. या दरम्यान, पोलिसांनी जवळपास अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये काही पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा काढायला सुरुवात केली. आज दुपारी या प्रकरणातील कुरीयर बॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कुरीयर बॉय नव्हे, तो तर बॉयफ्रेंड
या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलेला आहे. हा तरुण आणि संबंधित तरुणी एकमेकांना ओळखत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे त्यांचे कुटुंबीयही एकमेकांशी परिचित असल्याचं तपासात पुढे आले आहे. विशेष म्हणजे, या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे आणि तो या सोसायटीत सतत या तरुणीला भेटत असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
संयम सुटला अन तिचा राग अनावर
बुधवारी सायंकाळी ही तरुणी एकटी असताना तिचा प्रियकर घरी आला. त्याने येताना आपण कुरीयर बॉय असल्याचं सांगत सोसायटीत प्रवेश केला होता. तो फ्लॅटमध्ये गेल्यानंतर तरुणीने मासिक पाळीचं कारण सांगत शारीरिक संबंधाना नकार दिला होता. मात्र संबंधित तरुणाचं स्वत:वरील नियंत्रण ढासळल्यानं त्यानं तिच्यासोबत अर्धवट संबंध प्रस्थापित केले आणि तो तरुणीसोबत सेल्फी काढून निघून गेला.
बलात्काराची स्टोरी रंगवली
याच गोष्टीचा या तरुणीला राग आला आणि तिने आपल्यावर कुरीयर बॉयने बलात्कार केल्याची स्टोरी रंगवत पोलिसांकडे धाव घेतली. त्यापूर्वी तिने स्वत:च्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील डाटा डिलीट केला. तसेच त्याने काढलेला सेल्फीही एडिट केला. या सर्व बाबी तपासात समोर आल्या असून तरुणीच्या बोलण्यातील विसंगतीमुळे बॉयफ्रेंडचा राग आल्यानं तिनं ही सगळी स्टोरी रचल्याचं स्पष्ट झालं आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत अनेक कुरीयर कंपन्या, त्यांचे एजंट यासह सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. शेकडो पोलिस या प्रकरणाच्या तपासासाठी धावपळ करत होते. मात्र कुरीयर बॉय म्हणून ज्याच्याविरोधात तक्रार होती, त्याला या प्रकरणाची कल्पनाही नव्हती. तो गुरुवारी नियमीतपणे नोकरीच्या ठिकाणी गेला. तसेच एका लग्न समारंभालाही हजर राहीला. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याला हा संपूर्ण प्रकार कळला.





