पुणे : न्यूज कट्टा
पुण्यातील कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत वास्तव्यास असलेल्या तरुणीने कुरीयर बॉयने स्प्रे फवारून अत्याचार केल्याची तक्रार केली होती. मात्र आता ही तक्रारच खोटी असल्याचं निष्पन्न झालं आहे. या घटनेतील तरुणी आणि संशयित तरुणाची समोरासमोर चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. या तरुणीनेच संबंधित तरुणाला घरी बोलावल्याचंही समोर आलं आहे.
बुधवारी दि. २ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास एका कुरीयर बॉयने आपल्या घरी येवून जबरदस्तीने दार उघडण्यास भाग पाडून आपल्याला स्प्रेच्या सहाय्याने बेशुद्ध करत अत्याचार केल्याची तक्रार एका तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात दिली होती. यानंतर पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनीही या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत २० पथकांद्वारे तपास सुरू केला होता. मात्र यामध्ये मोठा ट्विस्ट आला असून संशयित आणि संबंधित तरुणी यांच्यात अनेक वर्षांपासून संबंध असल्याचं पुढे आलं आहे.
पोलिसांनी संशयित तरुण आणि फिर्यादी तरुणीला समोरासमोर बसवून चौकशी केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये या तरुणीनेच संशयित तरुणाला अर्थात आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलावून घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. तर तिने तक्रारीत नमूद केल्यानुसार कोणत्याही स्प्रेचा वापर झाला नसल्याचेही सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, या तरुणीनेच एका अॅपचा वापर करत फोटो एडिट करून त्यावर मी पुन्हा येईन असा मजकूर टाकल्याचेही पुढे आले आहे.
एकूणच ही संपूर्ण तक्रारच खोटी असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. केवळ आपल्या बॉयफ्रेंडवरील रागातून या तरुणीने ही स्टोरी रचली. मात्र पोलिस तपासात सत्य बाहेर आल्यामुळे या तरुणीची तक्रारच खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु तिच्या या कृत्यामुळे पोलिस यंत्रणेला प्रचंड त्रास सोसावा लागला आहे.
दरम्यान, पोलिसांनी संबंधित संशयित तरुणाला नोटीस देऊन सोडून दिले आहे. त्याला चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून आता संबंधित घटनेचा पर्दाफाश झाला असून फिर्याद देणाऱ्या तरुणीवर पुढे काय कारवाई होते हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.





