पुणे : न्यूज कट्टा
पुण्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पुणे शहरातील नाना पेठेत काल रात्री ही घटना घडली. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली असून पोलिसांनी आंदेकर हत्या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. पूर्ववैमानस्यातून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आल्याची माहितीही आता समोर आली आहे.
वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते. काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते नाना पेठ परिसरात थांबलेले होते. त्यावेळी काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करून घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात वनराज आंदेकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हल्ल्यापूर्वी आरोपींनी या परिसरातील वीजपुरवठाही बंद केला होता. विशेष म्हणजे आंदेकर हे कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे एकटेच होते. ही संधी साधून हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर कोयत्याने वार केले. आंदेकर यांच्यावर जवळपास पाच राऊंड फायर केल्याचेही निष्पन्न झाले आहे. दरम्यान, कौटुंबिक वाद आणि आर्थिक व्यवहारातून आंदेकर यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरु केली आहे. वनराज आंदेकर यांच्या चुलत बहिणीचा पती गणेश कोमकर याने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.





