पुणे : न्यूज कट्टा
पुण्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणतानाच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलिस अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील १८ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीणच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
पुण्यात मागील काही दिवसांत गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यामुळे पोलिसांकडून वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हेगारांवर वचक निर्माण केला जात आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला असून त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचा आदेश पारित करण्यात आला आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ पाचच्या अंतर्गत हडपसर, काळेपडळ, वानवडी, बिबवेवाडी, लोणी काळभोर, मुंढवा आणि फुरसुंगी या पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. त्यामध्ये मागील काही महिन्यांमध्ये २२ सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच मोक्का कायद्यांतर्गत ७८ गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून जवळपास ५० गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. बेकायदेशीर दारू विक्री, फसवणूक, सरकारी कामात अडथळा, मारहाण, जबरी चोरी, दरोडा यासह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांचा यामध्ये समावेश आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज नव्याने १८ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. त्यामध्ये काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कानिफनाथ शंकर घुले (वय ४९, रा. महम्मदवाडी), प्रमिला सर्विन काळकर (वय ४१), वानवडी पोलिस ठाण्याअंतर्गत रफीक ऊर्फ टोपी महमूद शेख (वय ५५, रा. कोंढवा), गब्बू ऊर्फ सनी प्रकाश परदेशी (वय ३३, रा. वानवडी गाव), कोंढवा पोलिस ठाण्यांतर्गत मौलाना रसूल शेख (वय २२), गणेश तुकाराम घावरे (वय २८), बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अविनाश अर्जुन जोगन (वय २७), सारंग बबन गायकवाड (वय ३०), लोणी काळभोरच्या हद्दीतील उमेश निवृत्ती राखपसरे (वय ५०, रा. थेऊर फाटा), विनायक अधिकराव लावंड (वय ३१), शुभम सुदाम वीरकर (वय २५). हडपसर पोलिस ठाण्याअंतर्गत रोहन सोमनाथ चिंचकर (वय २७, रा. गाडीतळ), बापू सुरेश मकवाना (वय २१, रा. गोसावी वस्ती). मुंढवा : अनिकेत राजेश शेलार (वय २२), दत्ता गणेश गायकवाड (वय ३६, रा. केशवनगर), दीपक गणेश गायकवाड (वय ३८, रा. केशवनगर) आणि फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमोल राजेंद्र तट (वय ४५, रा. पापडे वस्ती, भेकराईनगर) या १८ गुन्हेगारांचा समावेश आहे.





