PUNE BREAKING : भरदिवसा हत्येच्या घटनेने पुणे हादरले; बाजीराव रोडवर कोयत्याने वार करत १७ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या

पुणे : न्यूज कट्टा  

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वीच टोळीयुद्धातून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आज शहरातील बाजीराव रोडवर भरदिवसा घडलेल्या खूनाच्या घटनेने पुणे शहर हादरून गेले आहे. बाजीराव रोड परिसरात मास्क लावून आलेल्या तिघांनी एका १७ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केली आहे. ही घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

मयांक खराडे असं या हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयंक खराडे आणि त्याचा मित्र अभिजीत इंगळे हे दुचाकीवरून जात असताना महाराणा प्रताप उद्यानाजवळील दखनी मिसळसमोर जनता वसाहतीतून आलेल्या तीन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. तिघेही मास्क घालून आले होते. त्यांनी धारदार शस्त्राने मयांकच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत त्याची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या हत्या प्रकरणातील आरोपींची नावे निष्पन्न झाली असून ते नव्याने उदयास येणाऱ्या ‘माया टोळी’चे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. अभिजीत पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे अशी या आरोपींची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी गणेश काळे याची कोंढवा येथील खडी मशीन चौकात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली होती. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश काळेची हत्या घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. त्यानंतर आज भरदिवसा गजबजलेल्या भागात हत्येची घटना घडल्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!