पुणे : न्यूज कट्टा
उसन्या पैशांच्या वादातून एका तरुणीवर कोयत्याने वार करत तिचा खून केल्याची घटना पुण्यातील येरवडा परिसरात रामवाडी येथे घडली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली असून या प्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३०, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर) याला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुभदा कोदारे ही तरुणी मुळची कराड येथील रहिवाशी आहे. ती नोकरीच्या निमित्तानं पुण्यात वास्तव्य करत होती. येरवडा परिसरात असलेल्या रामवाडी येथील डब्ल्यूएनएस कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये अकाऊंटंट म्हणून ती काम करत होती.
याच कंपनीत कृष्णा कनोजा हाही काम करत होता. उसने घेतलेल्या पैशांवरून शुभदा आणि कृष्णा या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यातूनच काल मंगळवारी कंपनीची सुट्टी झाल्यानंतर शुभदा घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी कृष्णा कनोजा याने पार्किंगमध्ये तिला गाठले आणि स्वत:कडील कोयत्याने तिच्या उजव्या हातावर वार केला. हा वार इतका भयानक होता की तिचा हातच तुटला.
या घटनेनंतर शुभदाला येरवड्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी कृष्णा कनोजा याला अटक केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके अधिक तपास करीत आहेत.





