PUNE CRIME : चुलत भावांमधील वाद विकोपाला गेला अन त्यानं थेट भावाला पाचव्या मजल्यावरून ढकललं; पुण्यात उडाली खळबळ

पुणे : न्यूज कट्टा

एका तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या चुलत भावाला पाचव्या मजल्यावरून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या घटनेत पाचव्या मजल्यावरून पडल्यामुळे संबंधित भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. या खळबळजनक घटनेनंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अमर देशमुख (रा. धायरी) असं या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर राजू भुरेलाल देशमुख या चुलत भावाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमर आणि राजू हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. मूळचे मध्य प्रदेशमधील बालाघाटचे रहिवासी असलेले हे दोघे भाऊ पुण्यातील धायरी परिसरात सोनपापडी बनवण्याच्या कारखान्यात कामाला होते.

हे दोघेही आपल्या कुटुंबासह धायरी येथील कपिल अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून या दोघा भावंडांमध्ये सातत्यानं वाद सुरू होते. त्यातूनच आरोपी राजू हा अमरच्या पत्नीला शिवीगाळ करत होता. त्यावरूनच त्यांच्यात वाद विकोपाला गेल्यानंतर अमर हा राजूला मारण्यासाठी अंगावर धावला. मात्र या झटापटीत राजूने अमरला थेट पाचव्या मजल्यावरून खाली ढकललं. यात अमरचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर खूनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादाचं पर्यावसान हत्येमध्ये झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस अधिक तपास करत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!