पुणे : न्यूज कट्टा
मुलीसोबत लग्न करायची इच्छा व्यक्त करणाऱ्या एका कामगाराला बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील गोखलेनगर परिसरात घडली आहे. शनिवारी दि. १ फेब्रुवारी रोजी मारहाणीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
दिलीप यल्लप्पा अलकुंटे (वय ४५) असं या मारहाणी मृत पावलेल्या कामगाराचं नाव आहे. त्याच्या खून प्रकरणी रामजी निलू राठोड, अनुसया रामजी राठोड, करण रामजी राठोड आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिलीप अलकुंटे यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. एका गॅरेजवर काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.
दिलीप यांनी रामजी राठोड या बिगारी कामगाराकडे त्यांच्या मुलीशी लग्न करण्याबद्दल विचारणा केली होती. त्यातूनच रामजी राठोड व त्याच्या कुटुंबीयांनी तुझे वय काय आणि आमच्या मुलीचे वय काय असा सवाल करत दिलीप अलकुंटे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. याला आता जीवंतच पुरू असं म्हणत त्यांनी दिलीप अलकुंटे यांना बेदम मारहाण केली. यात दिलीप हे गंभीर जखमी झाले.
शनिवारी रात्रीच्या सुमारास ते गोखलेनगर येथील शहिद तुकाराम ओंबाळे मैदान परिसरात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चतु:श्रूंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दिलीप अलकुंटे यांना ससून रुग्णालयात दाखल करत खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मात्र उपचारादरम्यान, काल दिलीप यांचा मृत्यू झाला. त्यानुसार आता पोलिसांनी कलम वाढवत खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी दिलीप यांच्या वहिनी पुष्पा राजेश अलकुंटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी रामजी व अनुसया राठोड यांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक विजयानंद पाटील यांनी दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार करत आहेत.





