पुणे : न्यूज कट्टा
आजकाल प्रत्येकजण सोशल मिडियाचा वापर करताना आपण पाहतो. त्यामुळं सोशल मिडियात वेगवेगळ्या जाहिराती प्रसारीत करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मात्र पुण्यातील एका कंत्राटदाराला जाहिरात पाहून संबंधितांशी संपर्क साधणं चांगलंच अंगलट आलं आहे. मला आई बनव, २५ लाख रुपये मिळतील अशी जाहिरात प्रसारीत करणाऱ्या टोळक्यानं या कंत्राटदाराला चक्क ११ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सप्टेंबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात कंत्राटदराच्या मोबाईलवर प्रेग्नंट जॉब अशी एक जाहीरात आली होती. त्यात व्हिडिओत एक महिला बोलताना दिसते की, मला आई बनवेल अशाच व्यक्तीच्या मी शोधात आहे. मला त्या व्यक्तीच्या जातीशी, शिक्षणशी, रंगाशी फारसं महत्त्वाचं वाटत नाही. संबंधित व्हिडिओत फोन नंबरही देण्यात आला होता. संबंधित कंत्राटदराने या नंबरवर संपर्क साधत याबद्दल माहिती घेतली.
तुम्ही एका महिलेला प्रेग्नंट केल्यास तुम्हाला थोडेथोडके नाही, तर २५ लाख रुपये देण्यात येतील असं सांगण्यात आलं. तसेच महिलेसोबत राहण्यासाठी नोंदणी करावी लागेल आणि ओळखपत्र तयार करण्यासाठी प्रक्रिया करावी लागेल अशी माहिती देण्यात आली. त्यानुसार नोंदणी शुल्क, ओळखपत्र, व्हेरिफिकेशन, जीएसटी अशा विविध कारणांसाठी पैशांची मागणी करण्यात आली. त्यानुसार संबंधित कंत्राटदाराने सप्टेंबर ते २३ ऑक्टोबरदरम्यान वेळोवेळी ११ लाख रुपये संबंधितांना पाठवले.
त्यानंतर त्यांनी कंत्राटदाराला वेगवेगळी आश्वासनं द्यायला सुरुवात केली. एवढी रक्कम देऊनही प्रक्रिया पुढे जातच नसल्यानं या कंत्राटदाराने जाब विचारला. मात्र समोरून उडवाउडवीची उत्तरे देत त्यांना ब्लॉक करण्यात आलं. त्यामुळं आपली फसवणूक झाल्याचं या कंत्राटदारांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने पुण्यातील बाणेर पोलिस ठाण्यात जाऊन याबद्दल तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला आहे.





